सात लाखांच्या लाचप्रकरणी सांगलीच्या उपायुक्ताला अटक   

सांगली : चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी ७ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. वैभव साबळे (वय-३१) असे या अधिकार्‍याचे नाव आहे.या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून नगररचना, बांधकाम विभागासह टक्केवारीचे कुरण असणार्‍या सर्व कार्यालयांत शांतता पसरली आहे. तसेच, अधिकारी, कर्मचारी गायब झाले आहेत. याबाबत गुन्हा नोंद करून अधिकार्‍यावर अटकेची कारवाई सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
संबंधित तक्रारदारांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने १७ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. त्यानुसार पडताळणी केली असता, संशयित उपायुक्त साबळे याने तक्रारदाराकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी करताना सात लाखांवर तडजोड केली. काल सकाळी उपायुक्त साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालिन पोलिस  अधीक्षक उमेश पाटील, पोलिस  निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, तसेच पोलिस  अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींनी ही कारवाई केली.

महापालिका वर्तुळात खळबळ

उपायुक्त साबळे याच्यावरील कारवाईचे समजताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. विभाग प्रमुख कार्यालयातून गायब झाले, तर कर्मचारी कामानिमित्त बाहेर पडले. नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना सहजासहजी मिळत नाही, याचे कारण काय हे उघडकीस आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.
 

Related Articles